CM devendra fadnavis Satara woman doctor’s death : सातार जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हारुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने स्वत:च्या तळहातावर आत्महत्येमागील कारण नमुद केलेले आढळले. या प्रकरणात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केलं आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आरोप केले जात आहेत. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तरूण डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हटले आहे.

या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खूपच गंभीर प्रकरण आहे. कारण एक तरूण डॉक्टर स्वत:च्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते ही आमच्यासाठी एक दु:खद गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने कालच जो संबंधित पोलीस अधिकारी आहे, त्याला निलंबित केले आहे. अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल.”

राजकारण करणे असंवेदनशील

या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधकांवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. “मला वाटतं की या प्रकरणात विरोधक जे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही खूप चुकीचे आहे. इतक्या संवेदनशील प्रकरणात, जेथे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, त्यातही राजकीय पोळी भाजण्याचे काम करणे ही असंवेदनशीलता आहे इतकेच मी म्हणेन,” असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आंबादास दानवेंचे फडणवीसांना ८ प्रश्न

यापूर्वी या घटनेवरून शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सरकारला जाब विचारत आठ प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात, अशी टीकाही दानवेंनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृहखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ!

१. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?

२. ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?

३. महिला डॉक्टचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?

४. हे खासदार महोदय नेमके कोण?

५. या महिला डॉक्टरला बीड वरून हिनवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?

६. ‘पारदर्शक’ आणि ‘गतिमान’ शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?

७. चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?

८. या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?

आज लाडकी बहीण पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्ती गरज आहे. फडणवीस जी, तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात.. राजीनामा द्या!” असे अंबादास दानवे त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.