संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकुरबुवा समाधी येथे संपन्न झाले. गोल रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा पार पडल्यानंतर माऊली आणि संत सोपानकाका या दोन भावंडांची भेट पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे झाली.तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे मुक्कमी आली आहे. तर जवळपास ६५० किलोमीटरचा पायी प्रवास करून संत मुक्ताईची पालखी पंढरीत दाखल झाली. आता वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.
आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. अनेक वारकरी बस किंवा इतर वाहनांनी विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. २९ जूनला विठुरायाची महापूजा केली जाणार आहे. पंढरपूरात मोठ्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा- पंढरपूर: ज्ञानोबा आणि सोपानकाकांची बंधुभेट; वारकऱ्यांना आस विठूरायाची
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करणे तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांना समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.