सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना परखड शब्दांत सुनावताना आमदार अपात्रतेसंदर्भात तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. या मुद्द्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम म्हणून राहुल नार्वेकरांनी गुरुवारी तातडीने दिल्ली गाठल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट व ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे पिता-पुत्रावर एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. तसेच, त्यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी – संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाची तिरडी बांधल्याचं विधान केलं होतं. “एकनाथ शिंदे आणि त्यांचे १६ आमदार अपात्र ठरतील याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे. ही राजकीय तिरडी आहे. आता फक्त ‘हे राम’ म्हणायचं बाकी आहे. हे मी स्पष्टपणे सांगतो. मुडद्यात कितीही जीव फुंकण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी विज्ञान आणि कायदा यालाही मर्यादा आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

रामदास कदम यांचं प्रत्युत्तर

दरम्यान, संजय राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशानात जायला लागेल याचं दूध का दूध, पानी का पानी होईलच. निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून संजय राऊतांची पोपटपंची चालू आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवताय. यापेक्षा जास्त काय आहे तुमचं? तुम्ही फक्त देव पाण्यात ठेवून बसला आहात”, असं रामदास कदम म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

दरम्यान, यावेळी बोलताना रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. “आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य होणार नाही. उद्धव ठाकरेंवर बोलेन मी. आदित्य ठाकरेंची एवढी उंची नाही की मी त्यांच्यावर बोलावं. आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय”, असं रामदास कदम म्हणाले.