Shivsena MLA Disqualification Verdict Updates: गेल्या आठ ते १० महिन्यांपासून राज्यात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आपणच जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यात आता निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक असताना शिंदे गटाच्या एका आमदारांनी सूचक विधान केलं असून त्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नेमकं काय घडतंय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर आज ते निकाल देण्याची शक्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर राहुल नार्वेकरांनी निकाल देण्यासंदर्भात सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडलं होतं. मात्र, ते फेटाळून न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबरची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त १० दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानुसार आज ते या प्रकरणाचा अंतिम निकाल देणार आहेत.

संजय शिरसाट यांचं सूचक विधान!

दरम्यान, निकाल लागण्यास काही तास शिल्लक असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी काल घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे त्यांनी पराभव आधीच मान्य केल्याचंच उदाहरण असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे निकाल नेमका काय लागणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

काऊंटडाऊन सुरू! १६ आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल कुणाच्या बाजूने? नार्वेकरांच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष!

“या निकालाचे पडसाद देशभरात उमटतील. देशाचं लक्ष या निकालाकडे लागलंय. आमचा विजय होईल असं मला वाटतंय. ठाकरे गटानं सातत्याने आरोप करण्याचं धोरण अवलंबल्याचं दिसून आलं. आरोप करणं हाच त्यांचा स्वभाव झालाय. निवडणूक आयोगावरही त्यांनी आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी हे आरोप केले आहेत. तुम्ही आरोप करून काही होत नाही. तुम्ही ज्या चुका केल्या आहेत, त्यांचा परिणाम तुम्हाला दिसेल असं आमचं मत आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“…म्हणून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली”

दरम्यान, निकालाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ यावेळी संजय शिरसाट यांनी दिला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी निकाल बेकायदेशीरपणे शिंदे गटाच्या बाजूने लागण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “निकाल देताना कायद्याच्या चौकटीतला द्यावा लागेल. कायदा काय म्हणतो याला जास्त महत्त्व आहे. कालची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आरोप करण्यासाठीच होती. पराभव होणार हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळेच त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली. आम्ही पात्र झालो तर त्यांचे आमदार अपात्र होतील या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी ती पत्रकार परिषद घेतली होती”, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे.

“सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाणारच”

निकाल काहीही लागला, तरी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी जाणार आहेच, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. “हा निर्णय काहीही लागला, तर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाणं हे निश्चित आहे. त्यामुळे हा खटला सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. नार्वेकरांच्या निकालात मांडलेले मुद्दे हा त्या सुनावणीचा आधार असणार आहे. त्यामुळे कायद्याला धरूनच निकाल दिला जाईल. सर्वोच्च न्यायालयात निकाल कसा टिकेल, याकडेही नार्वेकरांचं बारीक लक्ष असेल”, असं संजय शिरसाट यांनी नमूद केलं.