महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातील तरतुदींवर आता राज्य विधिमंडळात चर्चा चालू आहे. या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या जात आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणाही केली. त्यासंदर्भात सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, खोचक शब्दांत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रताप सरनाईकक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली. यावेळी त्यांनी आधी भाषण केलेल्या प्रकाश सुर्वे आणि राम कदम यांचं कौतुक करताना “या दोघांचं प्रवचन तर अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल. त्यांना बरीचशी माहिती आहे त्यात”, अशी मिश्किल टिप्पणीही केली.

विजय वडेट्टीवारांची उक्ती, त्यावर मुख्यमंत्र्यांची युक्ती!

दरम्यान, यावेळी विजय वडेट्टीवारांनी एक म्हण ऐकवत राम कदम, प्रताप सरनाईक यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. “आधी खोदले खोडखाड, नंतर बसले तुळशीफळ”, असं म्हटलं. “त्यांना लागू होतंय म्हणून बोललो, अर्थ सांगू का?” असा प्रश्नही त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्यु्त्तर देताना “नाही, अर्थ नका सांगू. नंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. अर्थ सांगू नका”, असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.

“हा एकनाथ शिंदे कधी खोटं बोललेला नाही”

“शेतकऱ्यांना फसवल्याची ओरड झाली. पण आत्तापर्यंतच्या इतिहासात अतीवृष्टी, अवकाळी, गारपिटीला १५ हजार कोटी रुपये कधीच दिले नव्हते. आम्ही एनडीआरएफच्या नियमांच्या बाहेर जाऊन ही रक्कम डीबीटीनं दिली. एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही पैसे दिले. हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, कधी खोटं बोलणार नाही”, असं मुख्यंमत्री म्हणाले.

राज्य सरकारनं केली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ची घोषणा; कोणत्या धर्मीयांना मिळणार लाभ? एकनाथ शिंदे म्हणाले…

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या आक्षेपावरही मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. “विजयभाऊ, तुम्ही माझे मित्र आहात. खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय. बाकीच्या लोकांप्रमाणे तुम्हालाही सवय लागली आहे. खोटं बोला, पण रेटून बोला. असं चालतं का? वाण नाही, पण गुण लागला. तुम्हाला चांगलं समजत होतो. आपले मित्र आहात तुम्ही”, असं मुख्यमंत्री म्हणताच सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी त्यांना दाद दिली.

“दादा का वादा पक्का रहता है”

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जीआर एकनाथ शिंदेंनी यावेळी सभागृहात दाखवला. त्यावर बोलताना “आमचे दादा बोलले त्यानुसार जीआर काढला. दादा का वादा पक्का रहता है”, असं म्हणताच पुन्हा एकदा सत्ताधारी बाकांवर हशा पिकला.

जयंत पाटलांना खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर टीका करताना “चादर लगी फटने, खैरात लगी बटने” असा टोला लगावला होता. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी तोंडसुख घेतलं. “जयंत पाटील म्हणाले की लोकसभा में चादर फट गई. अरे कुणाची चादर फाटली? मोदी तर पंतप्रधान झाले. फाटली कुणाची? हरलेले लोक पेढे वाटायला लागले येड्यासारखे. तुम्ही कशाला पेढे वाटताय? विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून? विजयराव, तुम्ही त्यांना सांगा तरी. जंग जंग पछाडल्यानंतरही तुम्ही मोदींना हटवू शकले नाहीत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आम्ही मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. त्यामुळे काल तुमचे सगळ्यांचे चेहरे पांढरेफटक झाले होते. विजयराव तिथे नव्हते बोलताना. पण बाकीचे लोक होते, त्यांचे चेहरे मी बघत होतो. त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनात लोकसभेत जास्त जागा मिळाल्यानंतर एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. काल आम्ही घोषणा केल्यानंतर सगळ्यांना सुतक आलं होतं. सुपडा साफ झाला होता”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत; संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “एखादी व्यक्ती…”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचवेळी जयंत पाटील सभागृहात आले. तेव्हा त्यांच्याकडे बघून “जयंतराव आले, जयंतराव.. चादरवाले आले चादर”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टिप्पणी केली.