सत्ताधाऱ्यांची महायुती व विरोधकांची इंडिया आघाडी या दोन बैठकांमुळे मुंबईतलं राजकीय वाातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व नेत्यांनी भाजपावर व मोदींवर टीका केली असताना दुसरीकडे महायुकीच्या बैठकीतूनही प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर तोंडसुख घेतलं आहे. यावेळी महायुतीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला.

“यूपीए नाव ठेवायला त्यांना लाज वाटली”

इंडिया आघाडीवर टीका करताना एकनाथ शिंदेंनी यूपीए नावाचा संदर्भ दिला. “मोदींची बदनामी करण्याचं काम परदेशात जाऊन काही लोक करतात. खरंतर तोच देशद्रोह आहे. त्यामुळेच ही इंडी आघाडी.. इंडिया नाही.. इंडी आघाडी आहे. यूपीएचं नाव कायम ठेवायला त्यांना लाज वाटली. कारण यूपीएनं एवढा सपाटून मार खाल्ला, त्यामुळे नवीन इंडिया आघाडी तयार केली. जे लोक एक लोगो बनवू शकत नाहीत, ते कसे एकत्र जोडले जाणार? पंतप्रधानपदावर एकमत होणं तर लांबची गोष्ट आहे. मग ते लोकांबरोबर कसे जोडले जातील?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

“मुंबईत हवा व ध्वनीप्रदूषण वाढलंय. कारण गेल्या दोन दिवसांत इथल्या हवेत खोटारडेपणा आणि अहंकार मिसळलाय. कुणामुळे त्याची तु्म्ही माहिती काढा. संपूर्ण भारतातून इथे मुंबईत भ्रष्टाचाराचे वारे वाहात आलेत की काय अशी वातावरण निर्मिती इथे झाली आहे. ज्यांनी हयातभर फक्त भ्रष्टाचारच केला, त्यांच्या टोळ्या हयातमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी यावेळी केली.

अजित पवारांना कोपरखळी

दरम्यान, हयात हॉटेलमधील बैठकीवरून एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना कोपरखळी मारली. “हयातमध्ये आम्हीही गेलो होतो. अजित दादा आणि तटकरे होते. पण ते आता सांगत नाहीत. बऱ्याच गोष्टी हळूहळू सांगू आपण. पोतडीतून एकदम काढायचं नाही. अजित पवारांकडेही आहेत बऱ्याच गोष्टी”, असं ते म्हणाले.

Video: “इंडीची भेंडी आघाडी…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, बैठकीत ममता बॅनर्जीं…

उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला!

“यांची आघाडी म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. तिथे काही लोकांचं पंतप्रधानपदासाठी लॉबिंग चालू आहे. काही लोकांना पत्रकारांनी विचारलं की तुमचंही नाव पंतप्रधान म्हणून घेत आहेत. तर म्हणे ‘हां मी जाऊन लगेच शपथ घेतो’. पण शपथ कुठून घेणार? घरातून की ऑनलाईन? की वर्क फ्रॉम होम? ओथ फ्रॉम होम? फेसबुकवरून? ठीक आहे. जाऊ द्या. असे काही लोक आहेत”, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

इंडिया आघाडीच्या बैठकीआधी मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारला होता. “पंतप्रधानपदासाठी तुमचंही नाव घेतलं जात आहे, त्याविषयी काय सांगाल?” अशी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर “हां, मी आता लगेच जाऊन घेतो शपथ”, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.