सोलापूर : पुण्यात कोयत्याने हल्ला करणाऱ्यांपासून तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरुणांसह पीडित तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. परंतु बार्शी येथे गेल्या मार्चमध्ये एका अल्पवयीन मागास मुलीवर बलात्कार करून नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून तिच्यावर दोघा नराधमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. तिला मात्र शासनाकडून अद्यापी एक पैशाचीही मदत मिळाली नाही. पीडित मुलीवर अजूनही वैद्यकीय उपचार सुरू असून तिचे कुटुंब शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
बार्शीत बारावी परीक्षा देणाऱ्या अल्पवयीन मागास तरुणीला दोघा नराधमांनी वाटेत अडवून तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्यामुळे मोकाट असलेल्या दोघा आरोपींनी पीडित मुलीच्या घरात येऊन, आमच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार देतेस काय, असा जाब विचारत तिच्यावर कोयत्याने वार केले होते. यात तिच्या डोक्यावर आणि हातांवर गंभीर जखम झाली होती. डाव्या हाताची दोन बोटे तुटल्यामुळे ती कायमची अपंग झाली आहे.
या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असताना अखेर यात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. याच दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, रक्ताच्या थारोळय़ात निपचित पडलेल्या पीडित मुलीची छबी ओळख होईल अशा पद्धतीने समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. त्यामुळे खासदार यांच्या विरोधात बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पीडित मुलीवर सोलापुरात खासगी रुग्णालयात मोठा खर्च करून वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी जवळ पैसा नसल्यामुळे नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून उधारीने पैसे घेऊन उपचार केले गेले. आजही पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरला जावे लागते. यात मोठय़ा प्रमाणात होणारा खर्च पेलण्याची कुवत पीडित मुलीच्या कुटुंबीयांची नाही. बार्शीच्या या निर्भया प्रकरणाची चर्चा होत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन हवेतच विरून गेले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात एका तरुणीला कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असता हल्लेखोराला दोघा तरुणांनी प्रसंगावधान राखून पकडले आणि तरुणीचे प्राण वाचविल्याच्या घटनेची राज्यभर चर्चा झाली. यातील दोघा बहाद्दर तरुणांसह पीडित तरुणीला मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र बार्शीतील बलात्कार झालेल्या आणि नंतर मस्तवाल बलात्कारी तरुणांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्यामुळे महिनाभर मृत्यूच्या दारात राहिलेल्या पीडित अल्पवयीन मुलीला एका पैशाचीही मदत मिळाली नाही. फक्त आश्वासन मिळाले. त्याबद्दल पीडित मुलीच्या आईने तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली आहे.
बार्शी येथील दुर्दैवी मुलीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याबाबत योग्य पाठपुरावा सुरू आहे.
-शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
