Eknath Shinde On Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या अनेक नेत्यांकडून राज्यातील विविध भागात जाहीर सभा घेण्यात येत आहेत. या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आता बस्स झालं, या बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“शिवतीर्थावरची ही भव्यता हीच आपली महायुती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी विचाराचं सोनं वाटायचे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील विचाराचं सोनं वाटण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. आपल्याला २३ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे सर्वांनी फटाके तयार करून ठेवा. आपल्याला छोट मोठे फटाके नाही तर मोठे ऑटोबॉम्ब फोडायचे आहेत. काही दिवसांपूर्वी मोदी मुंबईत आले होते. त्यांच्याहस्ते काही विकास प्रकल्पाचं उद्घाटन झालं. मोदी हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. तसेच ते आमचे फ्रेण्ड, फिलॉसॉफर आणि गाइड देखील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काम करत असून आज आपलं राज्य एक क्रमांकावर आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट

“आम्ही दोन वर्षांपूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सहभागी झालो. आम्ही जो मार्ग स्वीकारला त्याची फळं महाराष्ट्रात आज पाहायला मिळत आहेत. २००४ ते २०१४ या काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राला जेवढा निधी मिळाला नाही त्याच्या पाचपट निधी महाराष्ट्राला मोदींनी दिला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. आजपर्यंत झालं नाही तेवढं काम आम्ही दोन वर्षांच्या काळात केलं आणि अडीच वर्षांच्या ग्रहणातून मुंबई आणि महाराष्ट्राला सोडवण्याचं कामही आम्ही केलं”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता खोचक टीका केली. ते म्हणाले, “तेव्हा बंद सम्राट राज्याच्या मुख्य पदावर बसले होते. आजही त्यांची भाषा तुम्ही पाहा. ते म्हणतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही विकासाची कामे बंद करू. कोकणातील रिफायनरी प्रकल्प बंद करू, धारावीचा प्रकल्प बंद करू, मग तुम्ही सुरु काय करणार ते तरी सांगा? पण आता बस्स झालं. या बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.