राज्यात कितीही वेळा सत्ताबदल झाला, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्याप कोणतंही सरकार ठोस असा उपाय करू शकलं नाही. त्यामुळे राज्याती शेतकरी अजूनही विवंचनेत असून काही शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलताना दिसत आहेत. आज देखील दुपारच्या सुमारास विधानभवन परिसरात उस्मानाबादमधील सुभाष देशमुख नावाच्या एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना भावनिक साद घालत खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे.

“मराठी मातीवर पहिला हक्क तुमचाच”

महाराष्ट्रातल्या मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचाच असल्याचं एकनाथ शिंदे या पत्रात म्हणाले आहेत. “माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो..सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र! महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे”, असं एकनाथ शिंदेंनी या पत्रात म्हटलं आहे.

“तुम्हाला हवालदील पाहून मन कासावीस होतं”

“नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात… हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं….वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय”, असं या पत्रात नमूद केलं आहे.

“हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे…!”

“माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे… तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….’, असं देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना उद्देशून या पत्रात म्हणाले आहेत.

“माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!

“शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका… आत्महत्या करू नका… मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, आपलं सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं आश्वासन देखील एकनाथ शिंदेंनी आपल्या पत्राच्या शेवटी दिलं आहे.