गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. भाजपा आणि शिंदे गटात मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच २०२४ मध्ये नेतृत्व कोण करेन? हे ठरवण्याचा अधिकार भाजपाच्या वरिष्ठांना आहे, असं विधान काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळेंच्या या विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चेला उधाण, CM शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “मी साताऱ्यात…”

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“२०२४ च्या निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. सध्या राज्यात शिवसेना-भाजपा युती सरकार आहे. आम्ही बरोबरीने काम करत आहोत. गेल्या ९ महिन्यात आम्ही राज्यातील जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विकासाची हीच घोडदौड २०२४ पर्यंत सुरू राहील आणि २०२४ मध्ये शिवसेना-भाजपा युती पूर्ण बहुतमताने जिंकून येईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत मनसेने स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी मांडली वेगळी भूमिका

२०२४ च्या नेतृत्वाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगवेगळी भूमिका मांडली होती. “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ च्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आमचं सरकार निवडणूक लढेल आणि आम्ही जिंकून दाखवू”, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर “२०२४ मध्ये नेतृत्व कोण करेन याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. यावर केंद्रीय संसदीय बोर्डाकडून निर्णय घेतला जातो. कोणत्या आमदाराला किंवा खासदाराला उमेदवारी द्यायची? कुणाला मंत्री बनवायचं? कुणाला मुख्यमंत्री बनवायचं? पार्टीचा अध्यक्ष कुणाला बनवायचं? हे सर्व निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाकडून घेतले जातात”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.