दोन वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील १६ आमदारांसह गुजरातचं सुरत शहर गाठलं आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर पक्षातील आणखी २४ आमदार त्यांना जाऊन मिळाले. पाठोपाठ शिंदे यांनी गुवाहाटी (आसाम) शहर गाठलं. गुवाहाटीत काही वाटाघाटी केल्यानंतर ते मुंबईत परतले आणि त्यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच भाजपाबरोबर हातमिळवणी करून राज्यात सत्तास्थापन केली. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये परस्परांवर कुरघोडीचे अनेक प्रयत्न झाले. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. पाठोपाठ विधानसभेच्या अध्यक्षांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव बदलण्यात आलं. तसेच त्यांना मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, विचार.. विकास.. आणि विश्वास… राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे.

शिंदे यांनी म्हटलं आहे की या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ लाभलं. उपमुख्यमंत्री देवेंद्रज फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कारामुळेच हे सगळं घडू शकलं. आम्हाला हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार. जय हिंद. जय महाराष्ट्र.