ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी व कार्यालयांवर मंगळवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणात ही धाड टाकल्याचं सांगितलं जात आहे. या धाडीनंतर विरोधकांकडून आकसापोटी कारवाई करण्यात आल्याची तक्रार केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला?’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरच हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

ईडीनं रवींद्र वायकर यांच्यावर टाकलेल्या धाडीप्रकरणी माध्यम प्रतिनिधींनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंना विचारणा केली असता त्यांनी ईडीवर महाराष्ट्र सरकारचा ताबा नसल्याचं सांगितलं. “रवींद्र वायकरांवर ईडीनं टाकलेल्या धाडीची मला माहिती नाही. मी माहिती घेतो. पण ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? ज्यांची काही चूक नसेल, त्यांना कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे? कोणत्याही प्रकारच्या सूड भावनेनं राजकीय आकस ठेवून आमचं सरकार कोणतंही काम करणार नाही”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“…म्हणून विरोधकांना पोटशूळ उठला आहे”

“कोविडमध्ये त्यांनी किती पैसे खाल्ले हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कफन चोर म्हणायचं की खिचडी चोर म्हणायचं? पुराव्याशिवाय आरोप करू नये. कुणालाही घाबरण्याची काय गरज आहे? जे काय असेल ते दूध का दूध, पानी का पानी होईल. आम्ही आकसापोटी कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. विरोधकांनी विरोध केलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय. त्यामुळेच त्यांना पोटशूळ उठला आहे”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड, वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र वायकर यांच्या घरासह त्यांच्याशी निगडित एकूण ७ ठिकाणी ईडीनं छापे टाकल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीच्या १० ते १२ अधिकाऱ्यांचं एक पथक रवींद्र वायकर यांच्या घरी दाखल झालं. तेव्हापासून ही कारवाई चालू आहे. २०२१ मध्ये जोगेश्वरीमध्ये २ लाख स्क्वेअर फूट बांधकामाच्या हॉटेलची परवानगी मिळवण्यासंदर्भात हा सगळा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.