कराड दक्षिण मतदारसंघ ही माझी कर्मभूमी असून, इथल्या लोकांच्या पाठिंब्यावरच आपण निवडणूक लढवणार असल्याबाबत दोनच दिवसात शिक्कामोर्तब होईल असा विश्वास देताना, येथील जनतेच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो असल्याची कृतज्ञता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. माझ्या पाठीशी पुन्हा भक्कमपणे उभे रहा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
कराड तालुक्यातील काले येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि थेट जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, मनोहर शिंदे, पहिलवान नाना पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, की आपण कराड दक्षिण मधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या मतदार संघात काँग्रेसची विचारधारा रूजली असून, ती जपणे गरजेचे आहे. सन १९९१ सालापासून मला कराडकरांनी तीनवेळा लोकसभेसाठी निवडून दिले. त्याची मला जाणीव आहे. त्यानंतरच्या काळात राजकारणात काही चढ-उतार आले, परंतु या तत्त्वांशी बांधीलकी ठेवल्यामुळेच तुम्हा सर्वाच्या पाठींब्यामुळेच मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. आता विधानसभेसाठी तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यापासून सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्याचा सातत्याने विकास करत आलो. अनेक महत्त्वपूर्ण व समाजोपयोगी कामे तडीस नेली आहेत.
सतेज पाटील म्हणाले, की कॉंग्रेसची विचारधारा असणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथल्या जनतेने पृथ्वीराजबाबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवणे, हेच आपल्या हिताचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वधर्मीयांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा आपल्याला घराघरात पोहोचवावी लागणार आहे. मदनराव मोहिते म्हणाले, की या मतदारसंघात भांडणे लावण्याचे उद्योग ३५ वष्रे करून आपला स्वार्थ साधला आहे. पण, जनता सुज्ञ झाली असून, सर्वानी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2014 रोजी प्रकाशित
‘कराड दक्षिणेत रूजलेली काँग्रेसची विचारधारा जपण्याची गरज’
कराड दक्षिण मतदारसंघ ही माझी कर्मभूमी असून, इथल्या लोकांच्या पाठिंब्यावरच आपण निवडणूक लढवणार असल्याबाबत दोनच दिवसात शिक्कामोर्तब होईल असा विश्वास देताना, येथील जनतेच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो असल्याची कृतज्ञता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
First published on: 21-09-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan in karad south