निवडणूक कामात टाळाटाळ, आचारसंहिता भंगाचे सहा गुन्हे

निवडणूक कामात टाळाटाळ केल्याबद्दल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापासून ते विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले.

निवडणूक कामात टाळाटाळ केल्याबद्दल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापासून ते विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले.
आचारसंहिता १२ सप्टेंबरपासून लागू झाली, तेव्हापासून वेगवेगळ्या घटनांवर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. करमाड येथील काँग्रेसचे कल्याण गायकवाड यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच वाहनांवर राजकीय पक्षांचे चिन्ह लावल्याबद्दल गणेश लोळगे, पोपट आवटे, आत्माराम शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. मंडळ अधिकारी वसंत नागरे यांनी निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. ५ हजार रुपयांची दारु व ८१ किलो गांजा पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मतदार जागृती अभियान
एकीकडे आचारसंहिता भंगाची कारवाई सुरू असतानाच प्रशासनातर्फे  मतदार जाणीव जागृती अभियानही हाती घेण्यात आले. शहरात सोमवारी वाहन रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखविला. रॅलीत ४०० कर्मचारी सहभागी झाले होते. औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौक, भडकल गेट, मिल कॉर्नर, शहानुरमियाँ दर्गा परिसरात वाहन रॅलीने मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. विधानसभा निवडणुकांसाठी २ हजार ७४७ मतदान केंद्रे प्रस्तावित केली आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळी ११७ मतदान केंद्रांची भर पडली, तर १८४ मतदान केंद्रांत बदल सुचविण्यात आले. ९ मतदारसंघांसाठी १६ हजार कर्मचाऱ्यांनी  सहभागी व्हावे, याचे आदेश देण्यात आले. शहरातील तीन विधानसभा मतदान केंद्रांवर प्रत्येकी ५ कर्मचारी, तर ग्रामीण भागातील केंद्रावर ४ कर्मचारी नियुक्त होणार आहेत. या कर्मचाऱ्यांना २ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Code of conduct violate six offence