विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्याच्या बहुतांश भागांतील रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळ असल्याने कमी-अधिक प्रमाणात थंडी आहे. विदर्भात मात्र सर्वच ठिकाणी तापमान सरासरीखाली गेल्याने काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यावर होत असून, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. राज्यातील हवामान कोरडे आहे. त्याच वेळेला समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती कार्यरत आहे. या परिस्थितीत तापमानात काही प्रमाणात चढ-उतार कायम आहेत. रविवारी मध्य प्रदेशातही थंडीची लाट होती. त्यामुळे विदर्भातील काही भागातही थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी या भागातील तापमानाचा पाराही १० अंशांखाली घसरला.

मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर वगळता इतरत्र किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. दिवसाच्या कमाल तापमानात मोठी घट झाल्याने उन्हाचा चटका नाहीसा झाला आहे. कोकण विभागातही रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold wave conditions in some parts of vidarbha zws
First published on: 21-12-2020 at 01:58 IST