सांगली : एसटी बसची ठोकर बसताच मागील चाकाखाली सापडून महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरूणी जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर घडली.अपघातात मृत झालेल्या तरूणीचे नाव शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय २१ रा. हरिपूर) असे आहे. ती हरिपूरहून मिरजेकडे दुचाकीवरून (एमएच १० सीजे २४५७) वरून निघाली होती.

जय मातृभूमी तरूण मंडळाच्या समोर आल्यानंतर समोरून मध्यवर्ती बस स्थानकाकडे निघालेल्या जमखंडी- मुंबई या बसला (एमएच १४ एलएक्स ५९२८) दुचाकी घासली. यात ती बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

विवाहितेचा खून

सांगलीतील शाहूनगर परिसरात एका विवाहित महिलेचा लाकडी दांडक्याने मारून खून करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. महिलेचा पती मात्र दोन मुलांसह गायब झाला आहे. हा खून पतीने केला असल्याचा संशय असून, पथक त्याच्या मागावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहूनगरमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून वास्तव्य असलेल्या शिलवंती पिंंटू पाटील (वय ४०, मूळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा जि. सोलापूर) या महिलेचा मृतदेह आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी घटनास्थळी येत पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले.काल रात्री दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला होता, अशी स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली असून, घटना घडल्यानंतर मृत महिलेचा पती दोन मुलांना घेऊन गायब झाला आहे. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.