दोन समाजात जातीय तणाव निर्माण करून शांतता भंग करण्याचे प्रयत्न सोलापुरात होता आहेत. एका नामांकित महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेणा-या एका तरूणाला, तू आमच्या धर्माच्या मुलींबरोबर का बोलतोस? लव्ह जिहाद करतोस काय, असे म्हणून त्याचे १५ जणांच्या टोळक्याने अपहरण केले आणि बेदम मारहाण केली. याप्रकरणी जखमी तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यापैकी एकाला अटक केली आहे.
हेही वाचा >>> सांगली: रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे प्रसारित




यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या पूर्व भागात असलेल्या एका नामांकित शिक्षण संस्थेच्या एमएसडब्ल्यू महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याकडे काही तरूणी भेटायला आल्या. नोकरी शोधण्याच्या विषयावर त्यांची चर्चा सुरू होती. तेथे काही वेळात पंधरा तरूणांचा जमाव आला. या जमावातील तरूणांनी पीडित तरूणाला अडविले आणि तू आमच्या धर्मातील तरूणींबरोबर का बोलतो? त्यांच्याशी लव्ह जिहाद करतोस काय,असा जाब विचारत त्याला बळजबरीने उचलून अक्कलकोड रोड एमआयडीसी भागात नेले. तेथे त्यास दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यातून कशीबशी सुटका झाल्यानंतर जखमी तरूणाने पोलिसांत धाव घेतली. वैद्यकीय उपचारासाठी त्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फिर्यादीनुसार हल्लेखोरांविरूध्द अपहरण, अडवणूक, मारहाण,गर्दी व हाणामारी, शिवीगाळ व खुनाची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एका तरूणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली. सोलापुरात तुळजापूर रस्त्यावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी दोन समाजात जातीयतेढ निर्माण करून प्रकारे शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला होता. एम्लाॕयमेंट चौकातही एका तरूणाला मारहाण करण्यात आली होती.