मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या एफआयआरच्या आधारे नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकबरोबरच पुणे आणि महाडमध्येही राणेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा >> ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेची दादरमध्ये राणेंविरोधात पोस्टरबाजी

> नाशिक

शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. यानंतर नाशिक पोलिसांची टीम चिपळूणच्या दिशेने रवाना झालीय. चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

नक्की वाचा >> “मी असतो तर कानाखालीच…”; मुख्यमंत्र्यावर टीका करताना नारायण राणेंचं खळबळजनक विधान!

> महाड

महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहराचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय भाजपा कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि करोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह १०० ते १२५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याचे पडसाद मुंबईत?; रात्री एक वाजता Tweet करत नितेश राणे म्हणाले…

> पुणे</strong>

पुण्यातील चतुःशृंगी पोलीस स्थानकामध्येही नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण राणेंचं नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.