राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. दरम्यान यावरुन गोपीचंद पडळकर यांनी टीका केली असून त्याला बाळासाहेब थोरात यांच्या लेकीने उत्तर दिलं आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर राजकीय संन्यास घेईन – वाचा सविस्तर

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते –

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी खोचक प्रश्न केला होता. “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र यापैकी काहीही झालेलं नाही”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. “सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही; हा भाजपाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,” असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

पडळकरांनी काय टीका केली

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या विधानावर आता गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला. “महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यामुळे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्रजी फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झालं आहे, याचंही भान यांना राहिलं नाही”, असं ट्विट पडळकरांनी केलं होतं.

बाळासाहेब थोरातांच्या लेकीचं उत्तर

गोपीचंद पडळकर यांच्या या ट्वीटला बाळासाहेब थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनीदेखील ट्वीट करुन उत्तर दिलं आहे. ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’, अशी टीका त्यांनी केली आहे.

“फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही; त्याचं काय झालं?”

फडणवीसांच्या कोणत्या वक्तव्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने

“स्वत:च्या नाकर्तेपणामुळे या सरकारने मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसींच आरक्षण परत आणू शकतो. खऱ्या अर्थाने आमच्या हाती जर सूत्रं दिली, तर मी दाव्याने सांगतो, ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”, असं फडणवीस म्हणाले होते. सरकारविरोधात २६ जून रोजी केलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी नागपूरमध्ये ते बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress balasaheb thorat daughter sharayu deshmukh on bjp gopichand padalkar sgy
First published on: 30-06-2021 at 09:11 IST