सोलापूर महानगरपालिकेत मागील तब्बल २५ वर्षांपासून अबाधित सत्ता सांभाळत शहराच्या राजकारणात दबदबा ठेवणारे काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्या गटाने पक्षश्रेष्ठींच्या विरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली होताच लगेचच मागे घेतला आहे. आठवडय़ापूर्वी काँग्रेसमध्ये राहायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत इशारावजा धमकावणारे पालिका सभागृहनेते महेश कोठे यांना आता गुडेवार यांची बदली होताच काँग्रेस पक्ष ‘प्रिय’ वाटू लागला आहे.
४ जुलै २०१३ रोजी पालिका आयुक्तपदावर रुजू झाल्यानंतर गुडेवार यांनी पारदर्शक, स्वच्छ व कार्यक्षम प्रशासन चालवून कारभाऱ्यांचे हितसंबंध दुखावले होते. राज्य व केंद्र सरकारच्या योजना मंजूर करून आणण्याकामी अचूक प्रस्ताव तयार करून पाठविणारे आयुक्त गुडेवार यांनी गेल्या अकरा महिन्यांत केवळ महापालिकेचेच हित पाहिले होते. अनेक हितसंबंधीयांची दुकानदारीच बंद झाल्यामुळे गुडेवार यांच्या विरोधात राजकीय डावपेच आखले गेले. त्यातून महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी विधान परिषदेवर आपले वडील विष्णुपंत कोठे यांना संधी डावलली गेल्याचे निमित्त पुढे करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात राहायचे की नाही, याचा फेरविचार करू आणि योग्य वेळी निर्णय घेऊ, असा सूचक इशारा दिला होता. हा इशारा देऊन आठवडाही लोटत नाही, तोच आयुक्त गुडेवार यांच्या बदलीचे आदेश निघाले आणि इकडे कोठे यांनीही आपला आक्रमक पवित्रा बदलून काँग्रेस ‘प्रिय’ असल्याचे स्पष्ट केले आहे. आयुक्त गुडेवार यांची बदली आणि त्यापाठोपाठ कोठे यांनी केलेले घूमजाव या बाबी एकमेकाशी निगडित आहेत की हा केवळ योगायोग आहे, याविषयी पालिका वर्तुळात प्रश्नार्थक चर्चा सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
गुडेवारांची बदली होताच कोठे यांना काँग्रेस ‘प्रिय’!
सोलापूर महानगरपालिकेत मागील तब्बल २५ वर्षांपासून अबाधित सत्ता सांभाळत शहराच्या राजकारणात दबदबा ठेवणारे काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्या गटाने पक्षश्रेष्ठींच्या विरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली होताच लगेचच मागे घेतला आहे.
First published on: 27-06-2014 at 04:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress beloved to kothe when replacing the gudewar