देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यापैकी तीन राज्यांत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर,काँग्रेसला केवळ एका राज्यावर समाधान मानावं लागलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला यश मिळवण्याची पूर्ण संधी होती. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने चांगल्या मताधिक्क्याने भाजपावर विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसचा हाच करिष्मा पुन्हा मध्य प्रदेशात होण्याची शक्यता होती. परंतु, काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

“कोणाची सत्ता मोठी आहे, कोणाचा आरोप मोठा आहे, कोणाची पॉवर मोठी आहे, हा आमचा प्रश्न नाही. कालच्या निकालानंतरही इंडिया आघाडी मजबुतीने उभी आहे. ६ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक खर्गेच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत होत आहे. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेही दिल्लीत सहभागी होणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “हा तर ईव्हीएमचा जनादेश”, तीन राज्यांतील भाजपाच्या विजयानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; तेलंगणाच्या निकालाबाबत म्हणाले…

“इंडिया आघाडीतील आमच्या काही मित्रपक्षांची पाच राज्याबाबत काही मते आहेत. खासकरून काँग्रेससारखा मोठा पक्ष असतो तेव्हा त्या राज्यातील लहान-लहान घटकांना विश्वासात घेतलं जात नाही. आघाडी पुढे घेऊन जायची असती तेव्हा पक्ष लहान असो वा मोठा सर्वांना सोबत घेऊन गेले असते तर कदाचित चांगला फायदा होऊ शकला असता”, असं संजय राऊत म्हणाले. मध्य प्रदेशात काँग्रेसने घटकपक्षांना विश्वासात घेतलं नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. तसाच, काहीसा दावा आता संजय राऊतांनीही केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रात २०१४ मध्ये शिवेसनेच्या बाबतीत झालं होतं, मोदींची लाट आल्यानंतर शिवसेनेसोबतची युती तोडली. आता भाजपाला पुन्हा लाट दिसत आहे, त्यामुळे मला चिंता आहे की सरकारसोबत जे बसले आहेत त्यांचं काय होणार. आपका क्या होका कालिया असा सवाल आहे. परंतु, काँग्रेससोबत आमचं नातं होतं तसं आहे. दिल्ली स्तरावर आमचं बोलणं सुरू आहे. महाराष्ट्रात त्यापद्धतीने जागावाटप केलं जाईल”, असंही राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.