विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बासला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले. शिवसेना तसेच काँग्रेसची मते फुटल्यामुळे पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाने ही कमाल करुन दाखवली आहे. महाविकास आघाडीची मतं फुटल्यानंतर आता काँग्रेसचे नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसची काही मतं फुटल्याचे मान्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार, फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”

“आमची प्रथम क्रमांकाची मतं होती ती आम्हाला दिसत नाहीयेत. म्हणजे आमचीच मतं बाजूला गेली आहेत. कुठे गेली? कशी गेली हा विषय वेगळा आहे. विधिमंडळ काँग्रेसचा नेता या नात्याने मी ही जबाबदारी स्वीकारतो. मी ही भावना दिल्लीला कळवणार आहे. याशिवाय पक्ष म्हणून आम्हाला विचार करावा लागेल. तसेच महाविकास आघाडी म्हणून आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करुन काय दुरुस्ती केली पाहिजे याच्यावर विचार कारावा लागेल,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा >>> “पाचव्या जागेसाठी एकही मत नव्हतं तरीही…”, विधान परिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडवणीसांचं मोठं विधान

तसेच, जवळपास २० ते २१ महाविकास आघाडीची मतं फुटली आहे. त्यामुळे सरकार अस्थिर होईल का? असे विचारल्यावर तशी शक्यता नाही असे स्पष्टीकरण थोरात यांनी दिले. “सरकारला धोका निर्माण होईल असं मला वाटत नाही. एकमेकांना दोष देण्यापेक्षा हे दोष आमचे- आमचे आहेत. ते दुरुस्त केले पाहिजेत. काँग्रेस म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. शिवसेनेनेही काळजी घेतली. मात्र हे कसं झालं हे मी आज लगेच काही सांगू शकत नाही,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक निकाल: भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्या चुरशीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत

दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची सात तर शिवसेनेची तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अपक्ष आमदारांनी जर या दोन पक्षाच्या उमेदवारांना मतं दिली असतील तर शिवसेना, काँग्रेसची आणखी मतं फुटली असावीत. दहाव्या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र काँग्रेसच्याच दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली. या लढतीत काँग्रेसचे भाई जगताप निवडून आले. तर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील एकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader balasaheb thorat first comment over defeat in legislative council election 2022 prd
First published on: 21-06-2022 at 07:56 IST