पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा पंधरवाड्याबाबत माहिती दिली आहे. तर, भाजपाच्या या सेवा पंधरावाड्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

“सेवाच करायची तर गांधी सप्ताह संयुक्तिक असता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ नावाने गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय!. गांधीजींचे विचार व कार्य विरुद्ध टोकाचे होते. त्यापेक्षा राज्य सरकारने सत्ता पंधरवडा नाव द्यावे.” असं सचिन सावंत ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

याशिवाय, “१७ सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. वाढदिवसाच्या जल्लोषात राज्य सरकारला याचा विसर पडणे यापेक्षा मराठवाड्यावर मोठा अन्याय असू शकत नाही. मराठवाडा मुक्तीसाठी झालेला संघर्ष व त्याग आठवणे, मराठवाड्याच्या प्रगतीचा निग्रह या वर्षात अभिप्रेत आहे.” असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे.

तर सेवा पंधरवाड्याबद्दल माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. माझा वाढदिवस साजरा करू नका, लोकांची सेवा करा, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा हा सेवा पंधरवाडा आयोजित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या पंधरवाड्यामध्ये जनतेला सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, विविध मागण्या, नकाशा यासारखे इतरही जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत, ते सर्व प्रश्न या पंधरा दिवसांमध्ये एका मिशन मोडवर निकाली काढायचे आहेत. या काळात लोकांना पूर्णपणे सेवा द्यायची आहे, अशा प्रकारे हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत” अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.