मराठा आरक्षण आणि त्याअनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन, त्यांचे राज्यातील विविध भागांतील दौरे, छगन भुजबळ व ओबीसी समुदायाची मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका या मुद्द्यांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तापल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासूनच मनोज जरांगे पाटील चर्चेत आले. आता त्यांनी मराठा आरक्षणासाठी थेट राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मात्र, आता यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय फिरवण्याची मागणी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी केली आहे.
नेमकं घडलं काय?
आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं नाव केंद्रस्थानी आलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे. मनोज जरांगे यांनीही लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात राज्य सरकारशी झालेल्या चर्चेच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन जरांगे पाटील यांनी घेतलं. त्यानंतर आता काँग्रेस नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक पत्र ट्वीट केलं आहे.
“टोळी मुकादमाला घरी बसवणार, म्हातारा झाला तरीही खूपच…”, मनोज जरांगे पाटील यांची भुजबळांवर टीका…
काय आहे पत्रात?
हे पत्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे. “जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची २० नोव्हेंबर २०२३ रोजी गृह विभागाच्या आदेशाने पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. वास्तविक तुषार दोषी यांच्यावर आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. सद्यस्थितीत त्यांची याप्रकरणी चौकशी चालू असल्याने ती पूर्ण होईपर्यंत त्यांच्या बदली आदेशास स्थगिती देण्यात यावी ही विनंती”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल
दरम्यान, हे पत्र व्हायरल होऊ लागल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी ते एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून सरकारला सवाल केला आहे. “महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? हे सरकार जनतेला मूर्थ बनवू पाहणारं हेराफेरी सरकार आहे. अंतरवाली सराटी येथील पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात ‘क्रीम पोस्ट’वर बदली मिळाली”, असं वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“ही शिक्षा की प्रमोशन?”
“मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन? अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे”, असंही वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.