राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. याच मुद्द्यावरून काँग्रेस आमदार आणि माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र बेवारस पडलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी करत आहेत, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. असं असूनही मंत्री नेमायची हिंमत यांच्यात नाही. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमले पाहिजे, संबंधित पालमंत्र्यांनी जिल्ह्यात गेलं पाहिजे. समाजकारणासाठी राजकारण असतं, केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण नसतं. त्यामुळे समाजकारणासाठीच राजकारण केलं पाहिजे. आज अख्खा महाराष्ट्र बेवारस पडलेला आहे. कोणतं खातं कुणाकडे आहे? याची कुणाला कल्पना नाही. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्लीत जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही” अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.

हेही वाचा- “तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी पुढे म्हटलं की, “अमरावती जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ घोषित झाला पाहिजे. मागील १५ दिवसांपासून याठिकाणी पाऊस कोसळत आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात चार पूर येऊन गेलेत. यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, तुरी सडल्या आहेत. त्यामुळे पुढील किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना पेरणी करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी” अशी मागणीही ठाकूर यांनी केली.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचवा दिल्ली दौरा, आज सायंकाळी होणार रवाना

दरम्यान, त्यांनी ईडी कारवाईवरून मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग थांबवावा, अन्यथा मोदी नीतीविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.