लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपानेही त्यांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर काँग्रेचे आणखी काही आमदार भाजपात जाणार असा दावा केला जातोय. हा दावा मात्र काँग्रेसने फेटाळला आहे. दरम्यान, याच धांदलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असे नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पोटोले नेमकं काय म्हणाले.

“भाजपाचे अनेक आमदार आमच्या सोबत आहेत. आम्ही जेव्हा हातोडा मारू तेव्हा दिसेल. मात्र सध्या हा विषय महत्त्वाचा नाही. भारत जलाऊ पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र जाळण्याचे पाप केले. भाजपाला महाराष्ट्र जाळण्याचा अधिकार नाही. सध्या भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र योग्य वेळी त्यावर निर्णय घेऊ,” असे नाना पटोले म्हणाले.

परिणय फुके यांचा मोठा दावा

दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्या रुपात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चव्हाण यांचे समर्थकही लवकरच भाजपावासी होतील, असा दावा भाजपाकडून केला जातोय. त्यासाठी चव्हाण आणि आमदारांच्या बैठका चालू आहेत, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. यावरच भाजपचे नेते परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसमधून भाजपात जाण्यासाठी तयार असणाऱ्या आमदारांचा थेट आकडा सांगितला आहे.

परिणय फुके नेमकं काय म्हणाले?

“मला असं वाटतंय की अशोक व्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करतील. यासंदर्भात अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत जे-जे होते ते सर्वजण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस तसेच राहुल गांधी यांच्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. काँग्रेसला कोठेही जनाधार नाही. दुसरं म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला त्यांचेच आमदार विरोध करतात. म्हणूनच आमदार मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करणार आहेत,” असे फुके म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील काही सूचक विधानं केली होती. आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत भविष्यातही इतर पक्षांचे नेते भाजपात येतील, असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress maharashtra chief nana patole claims bjp mla are in touch with congress prd
First published on: 18-02-2024 at 08:40 IST