मुंबई : विरोधकांना लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभव होणार याची खात्री आहे. त्यामुळे मतदान केंद्रे ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याचा कांगावा विरोधी पक्षांमधील नेते करीत आहेत. त्यांनी मतदानास पंधरा दिवस उलटल्यानंतर फेरमतदानाची मागणी करणे हास्यास्पद आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली. पवार आणि सुळे यांना आता काही कामच उरले नसल्याने ते आरोप करीत असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.

बीड व अन्य काही ठिकाणी बोगस मतदानाची तक्रार करीत फेरमतदानाची मागणी शरद पवार व सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना तटकरे म्हणाले की, फेरमतदानाची मागणी मतदानाच्या दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी होऊ शकते. पण १५-२० दिवसांनंतर मागणी करण्यात आली, याचा अर्थ विरोधकांना निवडणुकीचे निकाल काय लागणार आहेत, यांचा अंदाज आलेला आहे. हल्ली कुठल्याही ठिकाणच्या खोट्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवरून पसरविल्या जातात आणि बोगस मतदान केल्याचे आरोप होतात. पण, त्यात काही तथ्य नसते.

हेही वाचा >>>नाट्य परिषदेचे व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांना पुरस्कार जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत गरवारे क्लब हाऊसमध्ये सोमवारी सकाळी ११ ते १ या वेळेत बैठक आहे. बैठकीला खासदार, मंत्री, आमदार, पक्षाचे लोकसभा उमेदवार, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा १० जून रोजी वर्धापनदिन साजरा होणार असून त्यानिमित्त मुंबई, दिल्लीमध्ये कार्यक्रम होतील. या बैठकीत बड्या नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहेत. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे हे प्रवेश असतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.