काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीच्या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असली तरी अद्यापि या मुदतवाढीची व मोहिमेची अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहितीच मिळाली नसल्याचे समजले. जिल्हय़ात या मोहिमेसाठी दौरे, बैठकाही झाल्या नाहीत की आढावाही घेतला गेला नाही व निरीक्षकही जिल्हय़ाकडे फिरकले नाहीत याकडे काही पदाधिकारी लक्ष वेधत आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली काँग्रेस पक्षातील मरगळ अजूनही कायम असल्याचेच या मोहिमेने स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जयंत ससाणे यांनी अजूनही तालुक्यांना भेटी दिल्या नसल्याचे व पक्षाला शहर जिल्हाध्यक्षपदी कोणाची कायमस्वरूपी नियुक्ती करणे शक्य झालेले नाही. दीप चव्हाण यांच्याकडे प्रभारीच पद अद्यापि कायम असल्याचा दावा पक्षाचे निष्ठावान सदस्य करत आहेत.
पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम गेल्या फेब्रुवारीत सुरू झाली. सदस्यत्वासाठी केवळ ५ रुपये शुल्क ठेवण्यात आले होते. त्याची पावतीपुस्तके जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी जमा करण्यात आली. त्याच वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले होते. केवळ नगरमध्येच नाहीतर राज्यभरात अशीच परिस्थिती असल्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली. दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ नुकतीच म्हणजे १५ जूनला संपली. काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेश समितीकडे चौकशी करता, पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र ती कधीपर्यंत आहे, हे स्पष्ट झालेले नाही, त्याची माहिती स्थानिक पातळीवर कोणाकडेही उपलब्ध नाही.
यापूर्वी सत्तेत असताना काँग्रेसने गाजावाजा करत सभासद नोंदणी मोहीम राबवली. त्यासाठी पावतीपुस्तके छापून ती पदाधिकाऱ्यांना उपलब्ध केली होती. मोहिमेची माहितीही जाहीर केली जात होती. त्यासाठी पक्षाच्या जिल्हा, तालुका पातळीवर बैठकाही होत. जिल्हाध्यक्ष, नियुक्त केलेले निरीक्षक दौरे करत. मात्र यंदाच्या मोहिमेत अशीच कोणतीच प्रक्रिया पार गेली पाडली नसल्याकडे काही तालुकाध्यक्षांचे म्हणणे आहे. पक्षाच्या येथील कार्यालयात प्रदेश समितीशी संलग्न केलेली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा केवळ उद्घाटनापुरतीच वापरली गेली. आता त्यावरही धुळीची पुटे चढल्याचे सांगितले जाते.