काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनानं निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. करोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाचं निदान झालं होतं. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे आमदार अंतापूरकर यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आलं होतं. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून माहिती दिली. “माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,” अशी माहिती देत अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात असून, आमदार अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. अंतापूरकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत दोन आमदारांना करोनामुळे प्राण गमावावा लागला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla raosaheb antapurkar dies of covid 19 bmh
First published on: 10-04-2021 at 07:43 IST