काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या वेळी ट्विटरच्या माध्यमातून सतत टीका करणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार मोदी सरकारच्या काळात मात्र शांत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा अमिताभ, अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते का शांत आहेत?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

“…तेव्हा इंधन दरवाढीवर ट्विट करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का?”

यावेळी त्यांनी इशारा देताना सांगितलं की, “अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्या पद्धतीने ते लोकशाही मार्गाने मनमोहन सिंग यांचं सरकार असताना ट्विट करत होते त्याप्रमाणे आजही मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू अशी व्यवस्था करणार आहोत”.

बुधवारीदेखील महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकार व काही सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. ”युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारं सरकार होतं म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झालं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केलं नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचं जगणं कठीण झालं असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये, तर डिझेल ८६ रुपये लिटर झालं आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. करोना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणे कठीण झालं आहे, त्यात दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे. मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.” असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.