राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (रविवार, १६ जुलै) काही मंत्र्यांसह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती होती. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. सलग दोन दिवसांपासून ही भेट घडत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पण काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी अजित पवार गट आणि शरद पवारांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाचं भेटणं कुणालाही आवडलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “प्रत्येकाचं मत असं आहे की, अजित पवार गट आणि शरद पवार यांची भेट कुणालाही आवडलेली नाही. शरद पवारांकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. ते लोकशाहीच्या बाजुने उभे राहतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

“बंद खोलीतील चर्चा लवकरच बाहेर येतील”

याच भेटीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विश्वजीत कदम म्हणाले, “शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भेटलंच पाहिजे, ही नैतिकता आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की, अजित पवारांचा गट तिथे काय करत आहे? तो शरद पवारांना कशासाठी भेटत आहे. बंद खोलीत नेमकी काय चर्चा होतेय, हे सगळं येणाऱ्या काळात उघड होईल.”

हेही वाचा- अजित पवार गटाने शरद पवारांची घेतली भेट; नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, काँग्रेसच्या आक्षेपानंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले, “काँग्रेसला काय पटतं आणि काय पटू नये, यांच्याशी आम्हाला काहीही देणघेणं नाही. आम्ही आमचा पक्ष आणि आमचं राजकीय कुटुंब याचा विचार करण्याचं काम करू. काँग्रेसमधील वेगवेगळ्या प्रवाहाबद्दल मलाही खूप काही बोलता येईल.”