जालना : तीन वेळेस विधानसभा सदस्य आणि नगराध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे जालना शहरातील ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे पक्षाच्या मेळाव्यात गोरंट्याल यांच्यावर टीका करून त्यांना दीर्घकाळ पक्षात ठेवल्याबद्दल जालना शहरातील जनतेची जाहीर माफी मागितली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जालना शहराध्यक्ष अब्दुल रशीद पहेलवान यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या स्वागतासाठी आयोजित मेळाव्यात सपकाळ म्हणाले, एवढा विचित्र माणूस पक्षात धकवून घेतल्याबद्दल जालनाकरांची आपण माफी मागतो. गेले ते गेले, आता त्यांनी तेथे सुखी राहावे. काँग्रेस पक्ष हा तत्त्व आणि सिद्धांतांवर चालणारा पक्ष आहे.
खासदार कल्याण काळे हे गोरंट्याल यांना उद्देशून म्हणाले की, जे स्वतःला जलसम्राट म्हणवून घेत होते, त्यांच्या शहरात पाणीपुरवठ्याची अवस्था काय आहे ? भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या पाच वेळेसच्या कारकीर्दीचा उल्लेख करून काळे यांनी त्यांच्यावरही टीका केली. जालना शहर बकाल करण्याचे काम दानवे आणि गोरंटयाल यांनी केल्याचा आरोप काळे यांनी त्यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख टाळून केला. अब्दुल रशीद पहेलवान यांनी आपल्या भाषणात जालना शहराचा भावी महापौर काँग्रेसचाच असेल असा विश्वास व्यक्त केला. प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षद्वय कल्याण दळे आणि राजेंद्र राख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, पक्षाचे जिल्हा प्रभारी अशोक निलंगेकर, संजय मुथा यांच्यासह इतरांची भाषणे यावेळी झाली.
कर्जमाफीसाठी सरकारने अंत पाहू नये
दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात तहसीलदारांची गाडी फोडली. एकंदरीत जनतेच्या मनात सरकारविरोधात असंतोष आहे. आश्वासन देऊनही कर्जमाफी सरकार करत नाही. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवरील मागण्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. बच्चू कडू यांच्याशी आमचे संभाषण झाले आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत सरकारने पाहू नये. महाराष्ट्राला अराजकतेच्या खाईत देवेंद्र फडणवीस यांनी ढकलू नये. तातडीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने करावी, अशी मागणीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर बोलताना केली.
