विरोधी पक्षनेते अजित पवार हे सहकारी आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा गेले आठवडाभर सुरू होती. त्यातच गेले चार-पाच दिवसांत दोनदा ते संपर्कात नसल्याचे संशय बळावला होता. पण, ही सर्व चर्चा मंगळवारी अजित पवारांनी फेटाळून लावली. ‘माझ्या जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहून काम करणार आहे,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवारांनी राज्य सरकारला पाठिंबा दिला, तर तुम्ही सरकारमध्ये राहणार का? असा प्रश्न संजय गायकवाड यांना विचारण्यात आला. त्यावर गायकवाड यांनी म्हटलं की, “अजित पवार येताना शिवसेना आणि भाजपाचे विचार घेऊन येणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार येणार आहेत ना.”

हेही वाचा : “आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

“जी काही चर्चा सुरू होती, ती अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाची होती. आमच्याकडे गुजरातची पावडर नाहीये का, तुम्हाला माहिती नाही का?,” असेही संजय गायकवाड म्हणाले.

गायकवाड यांनी केलेल्या विधानाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आलं. त्यावर नाना पटोलेंनी सांगितलं, “अजित पवारांनी या सर्व गोष्टींवर पडदा टाकल्याने चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत बसणाऱ्यांना सत्तेचा माज आला आहे. अजित पवारांवर आमचा विश्वास आहे. अजित पवारांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे,” असं पटोलेंनी म्हटलं.

हेही वाचा : आमदार नितीन देशमुखांची संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली; ताब्यात घेताच म्हणाले, “मी मरेन पण जामीन घेणार नाही”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. माझ्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचं सांगितलं जाते. पण, आमदारांच्या सह्या घेण्याचं काहीही कारण नाही. माझ्या जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहून काम करणार आहे,” अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी मंगळवारी दिली.