दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. मिलिंद देवराप्रमाणेच काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >> VIDEO : मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती; म्हणाले, “मी काँग्रेस सोडेन वाटलं नव्हतं, पण…”

“देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणाऱ्या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांनाही आवडला नसेल”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

वर्षा गायकवाड यांचीही टीका

“ही निश्चितच खेदाची बाब आहे की, ज्यांना काँग्रेसनं खूप काही दिलं, ज्यांना विविध पदांवर बसवलं, खासदार बनवलं, केंद्रीय मंत्री केलं, त्यांनी संधी पाहून अडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडली. परंतु कोणाच्या जाण्यानं काही फरक पडत नाही”, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा >> काँग्रेसमध्ये फूट पडण्यास सुरुवात, मिलिंद देवरा यांच्यानंतर कोण?

मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश

आजपासून काँग्रेसची भारत न्याय यात्रा सुरू झाली. या यात्रेला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसचे युवा नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम केल्याचे वृत्त आले. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षप्रवेशानंतर संवाद साधताना मिलिंद देवरा म्हणाले, “मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असं कधी वाटलं नव्हतं. पण, काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षे असलेले नाते मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांची सेवा करणं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. जनतेच्या वेदना मुख्यमंत्र्यांना माहिती असतात. म्हणून त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही हात मला बळकट करायचे आहेत.”