scorecardresearch

“दुर्योधन व दु:शासनानं…”, शिंदे सरकारवर काँग्रेसचं टीकास्त्र, सत्ताधाऱ्यांना दिला इशारा!

कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा – काँग्रेसचा इशारा!

Eknath Shinde Devendra Fadanvis
प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर राजकीय गणितं बदलू लागली आहेत. त्यात शिवसेनेचाच एक गट भाजपासोबत गेल्यामुळे यापुढील राजकीय घडामोडींविषयी अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे सरकारचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या राजकीय महानाट्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत होत असताना दुसरीकडे काँग्रेसकडून राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यातून राज्यातील शिंदे गट आणि भाजपा युतीच्या सरकारवर आपल्या ट्वीटमधून ताशेरे ओढले आहेत. सचिन सावंत यांनी विद्यमान सरकारला दुर्योधन आणि दु:शासन यांच्या हातमिळवणीची उपमा दिली आहे.

काय आहे ट्वीटमध्ये?

सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “दुर्योधन’ म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व ‘दु:शासन’ म्हणजेच मोदी सरकारचे अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा”. शेवटच्या वाक्यात सचिन सावंत यांनी भाजपाला इशारा दिल्याचं दिसून येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था म्हणणाऱ्या गुलाबरावांना राऊतांचं उत्तर, म्हणाले “ते काही दुधखुळे…”

दरम्यान, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात जल्लोषात स्वागत होत असून विमानतळापासून त्यांच्या घरापर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी लवकरच महाराष्ट्रात मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी माहिती दिली. तसेच, विदर्भाच्या विकासाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सर्वांचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असणारं सरकार महाराष्ट्रात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress sachin sawant slams eknath shinde devendra fadnavis government pmw

ताज्या बातम्या