अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाभोवतीचं गुढ अजूनही उकलेलं नाही. सुशांतची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे सीबीआय तपासून नेमकं काय समोर येतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच यात हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा खुलासा केला. त्यावरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा साधला आहे.
सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. या मागणीवरून बरेच वादंगही निर्माण झालं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा तपास सीबीआयकडं सोपवला होता. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच आतापर्यंत कोणतेही हत्या केल्याचे पुरावे सापडले नसल्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत भाजपावर टीका केली आहे. “भाजपाचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर करण्याचं पाप भाजपाला खूप महाग पडणार आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.
#भाजपा का मूंह काला होने की प्रक्रिया शुरू हो गई है। सुशांत सिंह राजपूत की मृत्यु का राजनीतिक इस्तेमाल करने का पाप भाजपा को महंगा पड़ेगा। pic.twitter.com/iElwh6kcv5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2020
सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय अधिकार काय म्हणाले?
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनी इंडिया टुडे वृत्त वाहिनीशी बोलताना ‘सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. सध्या आत्महत्येच्या अँगलवरही आपण लक्ष देत आहोत. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरू आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट, संशयितांचे जबाब आणि क्राईम सीन रिक्रिएशनकडे पाहता यात हत्येकडे बोट दाखवणारे कोणतेही पुरावे सापडले नाही,” अशी दिली होती.