कोल्हापूर : भारतीय सैन्यदलाबद्दल कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात कोल्हापुरात काँग्रेसतर्फे शनिवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली.
राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात्रेच्या सुरुवातीला भला मोठा तिरंगा ध्वज, माजी सैनिक, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या, काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरीत्या ही तिरंगा यात्रा झाली.
भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषांनी मार्ग निनादला. बिंदू चौक येथे सांगता झाली. आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहूल देसाई, शशांक बावचकर, राजेश लाटकर, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.