पश्चिम महाराष्ट्र सहप्रांतसंघचालक म्हणून प्रताप भोसले यांच्यावर जबाबदारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम विभागाचे संचालक स्वर्गीय माणिकराव पाटील यांच्यानंतर तालुक्यातील दोघांवर रा. स्व. संघाने मोठी जबाबदारी टाकली आहे. विशेष म्हणजे दोघेही उच्चशिक्षित असून संघाकरिता त्यांनी दिलेल्या योगदानातून संधी देण्यात आली आहे.

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची नुकतीच नागपूर येथे सभा झाली. सभेत संघाच्या प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव यांची फेरनिवड करण्यात आली, तर सहप्रांतचालक म्हणून प्रताप भोसले यांची पश्चिम महाराष्ट्राकरिता निवड करण्यात आली. काँग्रेस विचारधारेच्या कुटुंबातील असूनही भोसले यांनी अमेरिकेत संघप्रचाराकरिता केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे.

नगर जिल्ह्य़ात कर्जतला स्वर्गीय माणिकराव पाटील यांनी पहिली संघाची शाखा सुरू केली. त्यांचा गोतावळा हा काँग्रेस विचाराचा होता. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे ते साडू होते; पण विधिज्ञ असलेले पाटील यांनी आयुष्यभर संघकार्याला वाहून घेतले होते. बेलापूरची शाखा ही अण्णाजी जाधव यांनी सुरू केली. त्यांनी तालुका प्रचारक म्हणून काम केले. आणीबाणीत संघाच्या १८ जणांना अटक झाली होती. संघाची शाखा चालू नये म्हणून जाधव यांच्यासह काही स्वयंसेवकांना मारहाण, धमक्या देण्यात आल्या होत्या. एका काँग्रेस नेत्याने तर पिस्तूल गोळीबार करुन धमकावले होते. ते पिस्तूल पोलिसांनी जप्त केले होते. जाधव यांनी अनेक संघशाखा सुरू केल्या होत्या. त्यांचे चिरंजीव सुरेश जाधव हेच आता प्रांतचालक आहेत. त्यांना नानासाहेब या नावानेच ओळखले जाते.

नानासाहेब जाधव हे संघाच्या बालशाखेत जात. कृषी अभियांत्रिकी शाखेचे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते शास्त्रज्ञ होते.  नंतर नोकरी सोडून देऊन त्यांनी संघकार्याला वाहून घेतले. सहचालक बनलेले प्रताप भोसले हे काँग्रेस परिवारातून आलेले आहेत. त्यांचे वडील सखाहरी भोसले हे अशोक सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. अनेक सहकारी संस्थेच्या संचालक पदांवर त्यांनी काम केले. मोठे बागायतदार असलेले मराठा समाजातील प्रताप भोसले हे संघशाखेत विद्यार्थिदशेत गेले. त्यांच्या कुटुंबातील स्वर्गीय आबासाहेब भोसले, स्वर्गीय जयसिंग भोसले, शहाराम भोसले, सुधाताई भोसले, विराज भोसले यांनी विविध सहकारी संस्थांवर काम केले असून काँग्रेसच्या प्रवाहातील आहेत. जितेंद्र भोसले हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतात. सध्या साई संस्थानचे विश्वस्त असलेले भोसले हेदेखील काही काळ काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते.

भोसले यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, तर अमेरिकेत दुग्ध व्यवसाय या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. १९९१ पासून ते अमेरिकेत जनावरांचा विमा व डेअरी सल्लागार म्हणून ते काम करत होते. या काळात त्यांनी उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या भागांत संघाचे काम केले.

सुमारे ७०० कुटुंब शाखा त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केल्या. सेव्ह काश्मीर समितीचे ते अध्यक्ष असून काश्मीर हा भाग भारताचा अविभाज्य भाग आहे, हे अमेरिकेतील विविध नेत्यांना पटवून देण्याचे काम ही संघटना करते. २०१४ मध्ये ते पुन्हा देशात आले. परदेशात कृषी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मदत करतात. त्यांचे प्रतिष्ठान त्याकरिता आर्थिक मदत करते. भोसले यांना नाना या नावाने संबोधले जाते. त्यांना संघात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

काँग्रेस परिवारातील असल्याने आश्चर्य

भोसले यांचा परिवार व गोतावळा हा काँग्रेस विचाराचा आहे. असे असूनही संघात त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकल्याने शंका व्यक्त केल्या जात होत्या. शिर्डी संस्थानचे विश्वस्त झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या; पण संघामुळे दखल घेतली गेली नव्हती. आता त्यांच्या नियुक्तीचे आश्चर्य काहींना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्थापन केलेल्या कामधेनू विद्यापीठाचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. हे विद्यापीठ गोवंशावर काम करते.