कराड : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्रा येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करेल, असा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील आदींची उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाबरोबरच अन्य स्वतंत्र संस्था काबीज केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त आहे का नाही, असा प्रश्न पडत आहे. ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. ही तर तात्पुरती व्यवस्था असून, त्याचा जनतेला फटका बसत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काँग्रेस भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत देण्यात यावी, असा ठराव संमत करण्यात आला. राज्यात कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास सातारा जिल्ह्यातील १,०७७ शाळा बंद होऊन तब्बल ११ हजारांवर मुलांचे शिक्षण थांबणार असल्याने त्याच्या निषेधाचाही ठराव बैठकीत करण्यात आला.