ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या सेवाग्राममध्ये आज काँग्रेस कार्यसमितीची बैठक
प्रशांत देशमुख, वर्धा</strong>
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘चले जाव’, ‘सविनय कायदेभंग’, ‘असहकार’, ‘व्यक्तिगत सत्याग्रह’ अशा स्फुल्लिंग चेतविणाऱ्या मंत्रांचे बीजारोपण सेवाग्रामला झाले. जवाहरलाल नेहरू हेच माझे उत्तराधिकारी, असा गांधीजींचा मानस येथेच व्यक्त झाला. महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे स्वातंत्र्यपूर्व भारताची राजधानी ठरलेल्या सेवाग्रामला काँग्रेस कार्यकारिणीच्या सातत्याने बैठका झाल्या. लढय़ाचे व काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी सेवाग्रामला येऊन गेली. आज काँग्रेस कार्यकारी समितीच्या २ ऑक्टोबरला होत असलेल्या बैठकीस अशी ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. सेवाग्रामातून गांधीजींच्या मार्गदर्शनात झालेला जागर स्वातंत्र्यप्राप्तीकडे नेणारा ठरला.
ऑक्टोबर १९३४ ला मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनात पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधायक कार्यात झोकून देण्याचा निर्णय महात्मा गांधींनी घेतला. अधिवेशनातून ते थेट २९ ऑक्टोबर १९३४ रोजी वध्र्यात आले. माझे अंत:करण खेडय़ात आहे, असे म्हणणाऱ्या गांधीजींचा निश्चय पाहून जमनालालजी बजाज यांनी सेवाग्रामच्या परिसरात त्यांची व्यवस्था केली. ३० एप्रिल १९३६ ला ते वध्र्यातून शेगावला चालत गेले. देवस्थानचे शेगाव परिचित असल्याने टपाल विभागाचा घोळ होत असल्याचे पाहून शेगावचे नामकरण सेवाग्राम झाले. गांधीजींना विचारल्याखेरीज काँग्रेस पुढाऱ्यांचे पान हलत नसे. सप्टेंबर १९३६ ला ब्रिटिशांनी काँग्रेसच्या अनुमतीशिवाय भारतास महायुद्धाच्या खाईत लोटण्याचा घेतलेला निर्णय गांधीजींना मान्य नव्हता. सेवाग्रामला व्यक्तिगत सत्याग्रहाची घोषणा झाली. यानंतर देशव्यापी आंदोलनाची संकल्पना मांडण्यात आली. या पाश्र्वभूमीवर १८ ते २२ डिसेंबर १९३९ ला सेवाग्रामात काँग्रेस कार्यकारी समितीची पहिली बैठक झाली. त्यात राजेंद्रप्रसाद, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, सरोजिनी नायडू, जमनादास दौलतराम, शंकर देव, डॉ. पट्टभी सीतारामय्या, अब्दुल कलाम आझाद, बिधानचंद्र रॉय, जे .बी. कृपलाणी, डॉ. पफुलचंद्र घोष, हरिसिंग मेहता हे सहभागी झालेत. महात्माजी व सी. राजगोपालाचारी हे विशेष निमंत्रित होते.
१९ ते २२ जानेवारी १९४० ला झालेल्या बैठकीत प्रामुख्याने बंगाल प्रांत काँग्रेसच्या वादाची बाब चर्चेत राहली. उपरोक्त नेत्यांखेरीज असफ अली व अच्युत पटवर्धन हे दोन नेते नव्याने सहभागी झालेत. पुढे १५ ते १८ एप्रिलला झालेल्या बैठकीत कृतिशील सत्याग्रहींची निवड करण्याचा निर्णय झाला. १७ ते २९ जून १९४० ला झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीस अब्दुल गफारखान व गोविंदबल्लभ पंत यांचीही हजेरी लागली. स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने चळवळ उभारण्याचा विचार झाला. १८ ते २३ ऑगस्टदरम्यान झालेल्या बैठकीत अहिंसा व चरखा हे तत्त्व न मानणाऱ्या फॉरवर्ड ब्लॉकच्या नेत्यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. १३ ते १६ जानेवारी १९४२ रोजी झालेल्या बैठकीत सर्वच युद्धांना प्रतीकात्मक विरोध करण्याची भूमिका गांधीजींनी मांडली. नेहरूंचे भाषण झाले. ३१ जानेवारीस स्वातंत्र्य दिनाच्या प्रतिज्ञेत सत्याग्रह शब्दाचा प्रथमच उल्लेख करण्यात आला.
ऐतिहासिक बैठक
१३ ते १४ जुलै १९४२ च्या काँग्रेस कार्यकारी मंडळाची बैठक इतिहास निर्माण करणारी ठरली. त्यामागे पाश्र्वभूमी होती. गांधीजींनी महायुद्धामुळे निर्माण परिस्थितीबाबत केलेल्या सूचनांचा अंमल अलाहाबाद अधिवेशनात न झाल्याने त्यांनी राजेंद्रप्रसाद, शंकर देव, वल्लभभाई पटेल, प्रफुलचंद घोष यांना चर्चेसाठी सेवाग्रामला बोलावले. ब्रिटिशांना भारत सोडण्याचा इशारा देण्याची वेळ आली असल्याचे या वेळी ठरले. या बाबीवर काँग्रेसमधील संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक बंडखोराची भूमिका घेतली. त्यापुढे नमते घेऊन सर्व काँग्रेस पुढाऱ्यांनी सेवाग्रामला झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ‘छोडो भारत’ ठराव अखेर संमत केला. ठरावास विरोध करणाऱ्या राजगोपालाचारी व भुलाभाई देसाई यांनी कार्यकारिणीचा राजीनामा दिला. सेवाग्रामच्या ठरावावर ६ ते १४ जुलै म्हणजे नऊ दिवस प्रदीर्घ चर्चा झाली. या ठरावास मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनात अंतिम स्वरूप देण्यात आले. या भूमिकेमुळे सेवाग्राम आश्रमवासीयांना झळ पोहोचू शकण्याची भीती व्यक्त झाली.
अपुऱ्या अन्नपाण्याशिवाय राहू शकणाऱ्यांनीच राहावे, अन्यथा सोडून जावे, असे सांगणाऱ्या महात्माजींना एकही कार्यकर्ता आश्रम सोडण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
६ मे १९४४ ला गांधीजींना तुरुंगातून मुक्त करण्यात आल्यावर ते जुलैअखेरीज वध्रेत परतले. बारा सहकाऱ्यांसह ३ ऑगस्टला सेवाग्रामला आले. सर्वप्रथम राजगोपालाचारी व नंतर श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांना भेटण्यास आले. गांधीजींनी नौखालीस प्रयाण केले. त्यानंतर मृत्यूच्या एक दिवसापूर्वी त्यांनी देशभरातील रचनात्मक कार्यकर्त्यांची एक बैठक सेवाग्रामला बोलाविण्याचा संकल्प सोडला. पण त्यांचे देहावसान झाल्याने पुढे काय, असा प्रश्न उभा झाला. त्यावर आचार्य विनोबा भावे यांनी पुढाकार घेत महादेव भवनात काँग्रेस कार्यकारी मंडळाची बैठक बोलावली. १२ व १३ मार्च १९४८ रोजी झालेल्या या बैठकीत आचार्य विनोबा, पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद व अन्य बडे पुढारी हजर झाले होते. महात्माजींचे खासगी सचिव असलेल्या महादेवभाई देसाई यांच्या नावाने हे भवन खादी, ग्रामसेवा व स्वावलंबनाचे उपक्रम यासाठी बांधण्यात आले होते. त्यासाठी आश्रमालगतची जमीन विकत घेण्यात आली. आश्रमाचे अभियंता रामदासभाई गुलाटी यांनी हे बांधकाम पूर्ण केले. सर्व सेवासंघाकडे याची जबाबदारी आली.
आश्रमाची नियमावली
सेवाग्राम आश्रमातील सर्व बैठकांना हजेरी लावणाऱ्या नेत्यांना आश्रमाची नियमावली कसोशीने पाळावी लागे. थुंकणे ही घाणच आहे. तो प्रकार करू नये. भांडी ठरावीक ठिकाणीच घासण्याचे बंधन होते. प्रत्येकाने आपले जेवणाचे ताट स्वत: उचलून धुवावे. हा आश्रम स्वत:चा व गरिबांचा आहे, ही भावना ठेवून वर्तन असावे. अशा या सूचनांचे पालन सर्वच राष्ट्रीय नेते करीत.
जेवण प्राकृतिक म्हणजेच आश्रमाच्या शेतात पिकणारेच धान्य उपलब्ध होते. कोहळय़ाची भाजी ठरलेलीच. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस नेत्यांनी चाखलेली ही भाजी आज पूर्वतयारी पाहण्यास आलेले काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी चाखली. साखरेच्या पदार्थास मनाई होती. नैसर्गिक गुळाचेच पदार्थ बनायचे. चटईवर बसून सर्व मंडळी भोजन करीत. अशा नोंदी आहेत. कोणत्याही बडेजावास पूर्णत: मनाई होती. २ ऑक्टोबरच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेत उपस्थित राहणाऱ्या काँग्रेसच्या आजच्या नेत्यांना याच अनुभवातून जावे लागणार आहे.
गांधींचे भाषण दिशादर्शक
१९४२ च्या जानेवारी महिन्यात सेवाग्रामला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत महात्माजींनी केलेले भाषण काँग्रेससाठी सर्वात दिशादर्शक ठरल्याची नोंद आहे. ते म्हणाले, मी बनिया आहे. व्यापार हाच माझा धर्म. काँग्रेसशी मी अहिंसेचाच व्यापार करणार. अहिंसा हे एक राजकीय शस्त्र मी काँग्रेसला दिले आहे. आपल्यात गट आहेत. युद्धात सहभागी व्हावे की होऊ नये, अशा दोन भूमिका आहेत. पण बळाच्या आधारावर उभे कितीही मोठे कार्य चिरकालीन नसते. हे अनुभवातीत सत्य होय. रचनात्मक कार्य हेच अंतिम सत्य होय, सत्ताप्राप्ती नव्हे, हे काँग्रेसने ध्यानात ठेवावे. काँग्रेस हे अहिंसक सैन्यदल होय, अशी अपेक्षा त्यांनी काँग्रेसकडून या भाषणात व्यक्त केली होती. महत्त्वाचे म्हणजे पं. जवाहरलाल व त्यांच्यातील नाते त्यांनी लोकांपुढे मांडले. राजाजी (सी. राजगोपालाचारी) नव्हे, वल्लभभाई नव्हे, तर जवाहरलाल हाच माझा उत्तराधिकारी राहणार. त्याच्या-माझ्यात मतभेद असणाऱ्या चर्चा होतात, पण आम्हाला विभक्त करणे कठीण आहे. मी आहे म्हणून तो माझ्याशी भांडतो. मी नसेल तेव्हा तो कुणाशी भांडणार, असे भावनिक नाते याच भाषणातून उलगडले होते.
गांधींपेक्षा कुणीच मोठे नाही. यापूर्वीच्या आश्रमातील एका कार्यक्रमात राहुलजींनी स्वत:चे ताट उचलले आहे. एका वेगळय़ा वातावरणात व पर्वावर ही बैठक होत आहे. त्याचे गांभीर्य सगळेच पाळतील. कुणाहीसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही.
– रणजीत कांबळे, काँग्रेस आमदार व स्थानिक संयोजक