परभणी : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार बबन लोणीकर यांचा येथे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. लोणीकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांना टपालाव्दारे कपडे, बूट, साडी चोळी व मोबाईल पाठवून कार्यकर्त्यांनी त्यांचा धिक्कार केला.’तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत.’ असे वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात बबन लोणीकर यांनी केले.
या वक्तव्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी सायंकाळी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. आज सायंकाळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लोणीकर यांचा निषेध केला. भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या विरुद्ध गरळ ओकत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नाही. लोकशाहीत मतदारांना शिव्या देण्याची प्रवृत्ती ही संविधानविरोधी आहे. अशी भावना व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांची मिजास ही जनतेच्या पैशाच्या जोरावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महागडे कपडे, बूट, विदेश दौरे हेही जनतेच्या पैशावर आहेत. असे असताना जनतेलाच एखादा भाजपचा लोकप्रतिनिधी शिव्या घालतो ही बाब निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी व्यक्त केली.
सुहास पंडित यांनीही लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणीकर यांच्या पत्त्यावर कपडे, बूट, मोबाईल अशा वस्तू टपालाने पाठवून दिल्या.या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप सोनटक्के, उपसभापती अजय चव्हाण, सुहास पंडित, दिगंबर खरवडे, वैजनाथ देवकते, श्रीराम जाधव, अंगद सोगे, शजी अहमद खान, तानाजी भोळे, शेख नबी, राम कुऱ्हे, विजय मोरे, राज बहिरट आदी पदाधिकारी उपस्थित होते.