लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या घरी मंत्री रविंद्र चव्हाण चहापाण्यासाठी गेल्याने नाराज झालेल्या पालकमंत्री व खासदारांनी कार्यक्रमावरच बहिष्कार टाकण्याची घटना गुरूवारी रात्री घडली. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालय इमारतीचे भूमीपूजन केले.

शासकीय विश्रामगृह आवार मिरज येथे सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचे आभासी पध्दतीने भूमिपूजन व लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते गुरूवारी रात्री नउ वाजता करण्यात आले. निमंत्रण पत्रिकेवर अध्यक्ष स्थान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तर प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह मान्यवरांची नावे होती.मात्र पालकमंत्री खाडे व खासदार पाटील यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तथापि, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जनुसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

आणखी वाचा-“भाजपाने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर…”, भारतरत्न पुरस्कारांवरून राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

तथापि, हरिपूरजवळ कृष्णा नदीवर नव्याने उभारलेल्या कोथळी पूलाचे उद्घाटन झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी मिरजेत थेट यावे आणि बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन करावे असा आग्रह पालकमंत्री खाडे आणि खासदार पाटील यांनी धरला होता. मात्र, मंत्री चव्हाण यांनी जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हे आपले मित्र आहेत, त्यांच्या निवासस्थानी चहापाणी करण्यास जाणारच अशी भूमिका घेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत कदम यांच्या निवासस्थानी गेले.

या प्रकारामुळे नाराज झालेल्या पालकमंत्री खाडे आणि खासदार पाटील यांनी मिरजेतील शासकीय कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमाचे आमंत्रण खुद्द पालकमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. या निमंत्रणानुसार अनेक कार्यकर्ते मिरजेतील कार्यक्रमासाठी हजर होते. मात्र, महायुतीत सहभागी असलेल्या जनुसराज्यचे प्रदेशाध्यक्ष श्री कदम यांच्या घरी मंत्री चव्हाण चहापाण्यासाठी गेल्याने आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना कार्यक्रम स्थळापासून परत या असे निरोप देण्यात आले. यामुळे आज दिवसभर जिल्ह्यात राजकीय नाराजी नाट्याची चर्चा सुरू होती.

आणखी वाचा-“घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी”, वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी…”

जिल्ह्यातील विविध ९ रस्त्यांच्या सुमारे ६६० कोटी ४१ लाख रूपये किंमतीच्या कामाचे तसेच ८ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या इमारती बांधकामाचे भूमिपूजन, ८८५ कोटी २८ लाख रूपये किंमतीच्या विविध ५ रस्त्यांचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करताना गत दोन वर्षात सांगली जिल्ह्यात जवळपास १३०० कोटी रूपयांची विविध विकास कामे झाली असल्याचे व काही कामे होत असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रारंभी दिप प्रज्वलन व सर विश्वेशरय्या यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सांगली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. आभार कार्यकारी अभियंता मिलींद कुलकर्णी यांनी मानले.