सांगली : सलग सुरू असलेल्या पावसाने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून, बोरगाव व सांगलीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कोयनेतही पाणीसाठा वाढला असून, कोयनेत २३ टक्के तर चांदोलीत ३९ टक्के जलसाठा रविवारी झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली.
गेल्या आठ दिवसांपासून वळीव स्वरूपात सुरू झालेल्या पावसाने मुक्काम ठोकला असून, दोन दिवसांपासून पश्चिम दिशेबरोबर आलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसाने द्राक्ष, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, उसाला मात्र हा पाऊस लाभदायी ठरणारा आहे. तथापि, रोहिणी नक्षत्रावर शिराळा पश्चिम भागात होणारी धुळवाफेवरील भात पेरणी लांबणीवर पडली आहे. रात्रीपासून उसंत घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा हजेरी लावल्याने खरीप पेरणीचे गणित यंदा चुकणार अशी भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात दमदार पावसाने ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून, येरळा नदीला पूर आला आहे. कृष्णाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने नदीतील पाणी पातळीही वाढली आहे. रविवारी आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी १५ फूट झाली. यात पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या चार दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७२ मिलीमीटर पाऊस झाला असून, धरणातील जलसाठा २४.३१ टीएमसी म्हणजे क्षमतेच्या २३ टक्के झाला आहे. तर चांदोली धरणाच्या परिसरात १७८ मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या चार दिवसांत झाली असून, रविवार सकाळी आठ वाजेपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १३.४७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, क्षमतेच्या ३९ टक्के धरण मे महिन्याच्या अखेरीस भरले आहे.