अलिबाग- रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर होता. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे ११६ मिमी, पेण येथे ७२ मिमी, मुरुड येथे १०४ मिमी, पनवेल ६० मिमी, उरण १०३ मिमी, कर्जत ३४ मिमी, खालापूर ५० मिमी, माणगाव ४७ मिमी, रोहा ५८ मिमी सुधागड ५२ मिमी, तळा ६१ मिमी, महाड २२ मिमी, पोलादपूर ४१ मिमी, म्हसळा ३६ मिमी, श्रीवर्धन ८७ मिमी, माथेरान ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या. हवामान विभागाने पावसाचा जोर आणखीन दोन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन वंरध घाटातून पुण्याकडे जाणारा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आले आहेत. अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केली आहे. तर ऑरेंज आणि रेड अलर्ट असताना सर्व प्रकारच्या वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2022 रोजी प्रकाशित
रायगड जिल्ह्य़ात पावसाची संततधार; शेतकऱ्यांना दिलासा, सखल भाग जलमय
रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-07-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuous rains raigad district consolation farmers areas waterlogged ysh