लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या भत्त्यामध्ये तफावत असून याबाबत प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय मतदान चिठ्ठी वाटपाचे काम करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांनाही भत्ता मिळालेला नाही. तसेच काही शिक्षकांना मतदान प्रशिक्षण शिबिरात सहभागी असतानाही भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे प्रकार घडले आहेत.
मतदानासाठी केंद्राध्यक्ष, १, २ व ३ क्रमांकाचे मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. केलेल्या कामाचे मानधन म्हणून देत असताना विधानसभा मतदारसंघनिहाय तफावत आढळून आल्याची तक्रार प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्राध्यक्षांना जतमध्ये प्रशासनाकडून एक वेळचे जेवण व १५५० रुपये भत्ता दिला गेला. शिराळा, मिरज, सांगली या मतदारसंघांत काम करणाऱ्या केंद्राध्यक्षांना एक वेळच्या जेवणासोबतच शिराळय़ा १७०० रुपये, मिरजेत १५०० रुपये तर सांगलीमध्ये १७५० रुपये भत्ता देण्यात आला आहे.
छलूस-कडेगाव, तासगांव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी व वाळवा या चार विधानसभा मतदारसंघांत केंद्राध्यक्षांना दोनवेळचे जेवण मिळाले, मात्र पलूसमध्ये १४०० रुपये, तासगावमध्ये १२५० रुपये व अन्य दोन मतदारसंघांत १४०० रुपये भत्ता मिळाला आहे. मतदान केंद्रातील १ नंबर अधिकाऱ्यांना काही ठिकाणी १ हजार रुपये, काही ठिकाणी ११०० रुपये तर काही ठिकाणी १३५० रुपये भत्ता मिळाला आहे. २ व ३ नंबरच्या अधिकाऱ्यांना ७५० ते १३०० रुपयांपर्यंत भत्ता वाटप करण्यात आले आहे.
या संदर्भात शिक्षक संघाने रीतसर तक्रार दिली असून एकाच कामासाठी भत्त्याचे प्रमाण वेगवेगळे कशासाठी असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थिती भत्ताही मिळालेला नाही. याबाबतही चौकशीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2014 रोजी प्रकाशित
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये तफावत असल्याची तक्रार
लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या भत्त्यामध्ये तफावत असून याबाबत प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
First published on: 23-04-2014 at 03:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contrast report in the allowance of election workers