गडचिरोली जिल्ह्य़ातील ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शीघ्र कृती दलातील उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
कटेझरीजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांचे दलम तळ ठोकून आहे, अशी माहिती गुरुवारी सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर ग्यारापत्ती पोलीस ठाण्यातील काही जवान व वडसाच्या उपमुख्यालयातील शीघ्र कृती दलाच्या काही जवानांनी जंगलात तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री ११ च्या सुमारास ही मोहीम सुरू असतानाचअचानक जोरदार पाऊस कोसळू लागला. यामुळे या जवानांनी जंगलातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. जवानांनी स्वत:ला तीन गटात विभागून घेतले. यापैकी एका गटाच्या दिशेने नक्षलवादी येत असल्याची चाहूल रात्री १२ च्या सुमारास जवानांना लागली. यानंतर सर्वाना सतर्क करण्यात आले. नक्षलवादी टप्प्यात येताच एका गटाच्या जवानांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दुसऱ्या गटावर गोळीबार केला. यात जावळे हा धारातीर्थी पडला. यानंतर ही चकमक सुमारे अर्धा तास सुरू होती.
रात्री १ च्या सुमारास नक्षलवादी जंगलात पळून गेले. या चकमकीची माहिती मिळताच गडचिरोली व कुरखेडाहून तातडीने अतिरिक्त कुमक या जंगलात पाठवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक भरमार बंदूक, एक बिनतारी यंत्रणेचा संच व दोन पिट्ट जप्त केले आहेत. चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या तीन साथीदारांना ओढत नेल्याच्या खुणा घटनास्थळी आढळल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.
उस्मानाबादवर शोककळा
जवान उमेश जावळे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील मेंढा गावचा राहणारा असून तो २०१० मध्ये गडचिरोली पोलीस दलात दाखल झाला होता. २८ वर्षांच्या या जवानाच्या वीरगतीने जिल्ह्यवर शोककळा पसरली आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयात अखेरची मानवंदना दिल्यानंतर हेलिकॅप्टरने त्याचे पार्थिव उस्मानाबाद जिल्ह्य़ात पाठवण्यात आले.