लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वेक्षणासाठी घरी गेले की, लोकं या कशाला आल्या? अशा नजरेने बघतात. आजारी आहे का कोणी, असे म्हटले की राग येतो अनेकांना. मग त्यांना समजावून सांगावे लागते, करोना संसर्गाच्या काळात अशी माहिती घेणे का गरजेचे आहे. प्रत्येक घरात वेगळे अनुभव घेणाऱ्या अंगणवाडीसेविकांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आहे. पण शहराच्या बरोबरीने ग्रामीण भागात काळजी घ्यायला हवी म्हणून  या लढय़ात उतरलो आहोत. ही या लढय़ाची पायवाट असेल पण तीच रस्ता दाखवू शकते. त्यामुळेच सर्वेक्षणाच्या कामात उतरलो असल्याची भावाना मंठा येथील अंगणवाडी सेविका कांता मिटकरी यांनी व्यक्त केली.

नेहमीचे काम म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कमी वजनाची बालके, गरोदर माता व लहान मुले यांच्याविषयी माहिती आणि सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना एप्रिलमध्ये करावायचे होते. त्यामुळे अंगणवाडीसेविका म्हणून असलेली अन्य कामे करताना करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर आरोग्यविषयक सर्वेक्षणाचे काम करावे लागते.  मात्र, असे हे सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकांना मास्क देण्यात आले आणि मदतनिसांना तेही दिले गेले नाहीत. अंगणवाडी सेविकांना दरमहा साडेआठ हजार तर मदतनिसांना साडेचार हजार रुपये मानधन मिळते. परंतु गेल्या जानेवारीपासून हे मानधनही मिळाले नाही. करोना संदर्भातील सर्वेक्षण करावे लागणार असल्याने त्यासाठी अंगणवाडी सेविकांना एक हजार रुपये अतिरिक्त भत्ता देण्याची घोषणा शासकीय पातळीवर झाली आहे. चार महिन्याचे नियमित मानधन अद्याप बाकी आहे. आता हे अतिरिक्त एक हजार रुपये कधी मिळतील, हे सांगता येत नाही, असेही कांता मिटकरी यांना वाटते.

मंठा नगरपंचयात क्षेत्रात एकूण १८ अंगणवाडीसेविका काम करतात. त्यापैकी एक असलेल्या कांता मिटकरी सांगत होत्या की, ‘आम्ही २२२ कुटुंबातील एक हजार १०० व्यक्तींचे सर्वेक्षण केले. एखाद्या कुटुंबात ताप, कोरडा खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास इत्यादी लक्षणे आहेत का, याची माहिती घेऊन त्याप्रमाणे वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा लागतो. त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारीनंतर विदेशातून आलेल्या कोणी व्यक्ती आहेत का, तसेच देशातील मोठय़ा शहरांमधून कोणी व्यक्ती आल्या आहेत काय, याचा तपशील घरोघर जाऊन घ्यावा लागतो.’

घरोघरी गेल्यानंतर मिळणारा मिटकरी यांचा अनुभवही वेगवेगळा आहे. त्या सांगत होत्या,‘ हे सर्वेक्षण करताना अनेक अडचणी येतात. मास्क लावून दारात उभे राहून माहिती घेणे  काही लोकांना आवडत नाही. काही ठिकाणी नापसंती दिसली तरी भर उन्हात दरवाज्यासमोर उभे राहून माहिती घ्यावी लागते. करोना संसर्गाच्या संदर्भात आरोग्यविषयक माहिती शासकीय यंत्रणेस देणे किती आवश्यक आहे, हे त्यांना समजावून सांगावे लागते. आम्ही लवकरात लवकर दारातून निघून जाऊ, याची वाट पाहिली जाते.’

घरोघरी फिरुन जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सामाजिक कर्तव्य म्हणूनही सर्वेक्षणाचे काम केले.

जालना शहरातील एका भागात आणि परतूर तालुक्यात एका गावात प्रत्येकी एक करोना बाधित रुग्ण होता. या ठिकाणी आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण केले. जोखीम असणाऱ्या भागातही अंगणवाडी सेविकांनी घरोघर जाऊन माहिती जमा केली.

संघटनात्मक पातळीवर अनेक मागण्या  शासनासमोर मांडत आलेलो आहोत. परंतु करोना विरोधातील लढा महत्त्वाचा असल्याने अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांनी सहभागी होऊन सर्वेक्षण केले. करोनाच्या संकटातून गाव आणि शहरे बाहेर पडणे, ही आजची आवश्यकता आहे. आमच्या मागण्या त्यानंतर पुन्हा शासनाकडे मांडू. जालना जिल्ह्यातील १ हजार ६०० अधिक अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची भावना आहे, असेही कांता मिटकरी म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona survey is the key to a real fight abn
First published on: 01-05-2020 at 00:25 IST