साताऱ्यात भाजप आक्रमक

कराड : करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची टाळेबंदी कायम असल्याने संताप व्यक्त करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यत ठिकठिकाणी भाविकांना देवदर्शनासाठी मंदिरे खुली करा या मागणीसाठी मंदिरांसमोर शंखनाद करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मद्यालये व बार खुले करताना, मंदिरे मात्र टाळेबंद का ठेवली गेली असा सवाल या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

राज्य शासनावर रोष व्यक्त करणाऱ्या या आंदोलनात महाविकास आघाडीचा धिक्कार करण्यात आला. मंदिरे बंद, उघडे दारू बार, अनागोंदी कारभार, उद्धवा अजब तुझे सरकार अशी घोषणाबाजी सातारच्या तुळजाभवानी मंदिरासमोर करण्यात आली. या वेळी घंटानादही करण्यात आला. भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन छेडण्यात आले. तर, कराडच्या प्रसिद्ध श्री मारूती बुवा मठासमोर वारकऱ्यांसमवेत झालेले मंदिरे खुली करा आंदोलन लक्षवेधी ठरले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शंखनाद आंदोलनात सहभागी झाले होते. टाळ मृदंगाचा गजर आणि शंखनाद करत कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

अन्य सर्व व्यवहार सुरळीत असताना केवळ मंदिरेच बंद का? असा सवाल करून एकनाथ बागडी म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धार्मिक स्थळं बंद ठेवून यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांची स्थिती अत्यंत बिकट केली आहे. समाजातील सर्व व्यवहारांना मुभा देताना, केवळ मंदिरेच बंद का ठेवली गेली याचा जाब या अन्यायी सरकारला विचारणे गरजेचे होते म्हणून हे आंदोलन छेडले असून, राज्य सरकारने जाणीवपूर्वक बंद ठेवलेली मंदिरे खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागडी यांनी या वेळी दिला.