scorecardresearch

ई-पास सुरु राहणार की बंद करणार? ठाकरे सरकारने केलं स्पष्ट

“ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता”

संग्रहित

राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात सध्या तरी ई- पासची अट रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. राज्यात करोना रुग्णवाढीमुळे काही काळ तरी ई- पास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

एसटी बसमधून ई-पासविना प्रवासाची मुभा असताना खासगी वाहनांना मात्र हा पास बंधनकारक आहे. त्यामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या सरकारने ई-पासच्या धोरणाबाबत फेरविचार सुरू केला होता. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आंतरजिल्हा एसटी बस सेवेला परवानगी देताना, त्यातून प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही, असं सरकारने जाहीर केलं. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे एसटी बस आणि खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांना वेगवेगळा न्याय का, असा सवाल करण्यात येऊ लागला. सरकारच्या या धोरणावर समाजमाध्यमांवर टीका सुरू झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coronavirus congress vijay vadettiwar on e pass in maharashtra sgy

ताज्या बातम्या