राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने दुकानं, गार्डन यांच्यासाठी वेळेची मर्यादा देत सुरु करण्याची परवानगी दिली असून खासगी कार्यालयांनाही ठराविक मनुष्यबळासोबत काम करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे ३० जून नंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणी मारामारी करायला कोणी येत नाही”, उद्धव ठाकरेंनी फेटाळलं ‘ते’ वृत्त

“करोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

“सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचं ऐकत आहे. म्हणून मी जनतेचे आभार मानतो. गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपल्याला करोनासोबत जगायला शिकलंच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचं पालन करावंच लागणार आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown shivsena cm uddhav thackeray on lockdown extension sgy
First published on: 10-06-2020 at 16:32 IST